Thursday, 15 June 2023

मन मोकळं जगणं

वेळ बदलली, काळ देखील पुढे सरकला
पण एक गोष्ट आहे, जी आज देखत जमत नाही
मन मोकळं जगायचं

कधी एखादं नातं, तर कधी कोणाला दिलेला शब्द
कधी आपली नोकरी, तर कधी आपलं कर्तव्य
ह्या सर्व गोष्टी जपताना एक गोष्ट राहून जाते
मन मोकळं जगायचं

सगळ्यांची मन जपण्यास धडपडतो
सर्वांच्या नजरेत कधी उत्तम ही ठरतो
पण हे होऊन देखील आतल्याआत घुसमटत असतो
कारण सगळे करतो, पण जाणूनबुजून टाळतो ते
मन मोकळं जगायचं

कित्येकदा विचार येतो 
आपलं मत बेफिकीर होऊन मांडण्याचं
नेटून जगाला आपली लक्षमन रेषा दाखवून देण्याचं

पण स्वहितासाठी घेतलेला तो एक पाऊल 
निमूटपणे आपो आप मागे येतो
आणि चेहऱ्यावर पुन्हा तो खोटं हास्य पसरवून 
अगदी सहजपणे गिळून टाकतो, तेवढंच आपलं 
मन मोकळं जगणं

-SR.